सकल मराठा समाज राजकीय पक्षाची स्थापना करणार  

324

कोल्हापूर, दि. १२ (पीसीबी) – मराठा आरक्षणासह विविध मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. कोल्हापुरात पक्ष स्थापनेसंदर्भात मराठा समाजाचा मेळावा शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर सभागृहात आज (बुधवार)  झाला.

मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी राजकीय पक्षाची गरज असल्याचे एकमत झाले. दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात नव्या पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या मागण्या राजकीय मार्गाने पूर्ण करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.

विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने इतकी  आंदोलने करूनही  मागण्यांसंदर्भात सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मराठा समाजाने राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने सुमारे ५८ मूकमोर्चे काढण्यात आले  आहेत. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.  मागास वर्ग आयोगाचा पहिल्या टप्पयातील अहवाल उच्च न्यायालयात नुकताच सादर करण्यात आला आहे. तर अंतिम अहवाल येत्या १५ नोव्हेंबर सादर करण्यात येईल, असे मागास वर्ग आयोगाने न्यायालयात सांगितले आहे.