संसदेच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान मोदींची ‘ती’ टिप्पणी कामकाजातून वगळली   

341

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे उमेदवार बी. के. हरीप्रसाद यांच्या नावावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्षेपार्ह आणि उपरोधिक टिप्पणी  केली होती.   मात्र, ही टिप्पणी राज्यसभेच्या कामकाजातून वगळण्यात आल्याने  मोदींच्या वर नामुष्की ओढवली. संसदेच्या इतिहासात देशाच्या पंतप्रधानांची टिप्पणी कामकाजातून वगळण्याचा  हा पहिलाच प्रकार घडला आहे.   

राज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडणुकीत जनता दल युनायटेडचे सदस्य हरीवंश  निवडून आले. त्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी यांनी बी. के. हरीप्रसाद यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. मोदी यांच्या या टिप्पणीची गुरुवारी दिवसभर संसद सदस्यांमध्ये चर्चाही होती. पंतप्रधानांची ही टिप्पणी आक्षेपार्ह असल्याची तक्रार राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य मनोज झा यांनी केली. त्यानंतर उपराष्ट्रपती व सभापती वेंकय्या नायडू यांनी पंतप्रधान मोदी यांचे विधान कामकाजातून वगळण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेली टिप्पणीही नायडू यांनी कामकाजातून वगळली आहे.  संसदेच्या इतिहासात प्रथमच देशाच्या पंतप्रधानांच्या विधानाचा एक भाग कामकाजातून वगळण्यात आला आहे, त्यामुळे पंतप्रधानांवर नामुष्की ओढवली आहे, अशी खोचक प्रतिक्रिया काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे.