‘संभाजी राजा दारुच्या कैफात सापडला’; ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ पुस्तकात वादग्रस्त उल्लेख  

493

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात ‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा वादग्रस्त उल्लेख केल्याचे उघडकीस आले आहे. संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर आक्षेप घेतला आहे.

‘समर्थ श्री रामदास स्वामी’ हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे प्रकाशन नागपूरमधील लाखे प्रकाशनाने केले आहे. या पुस्तकातील पान क्रमांक १८ वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख करण्यात आला आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा उल्लेख या पुस्तकात केला आहे.

दरम्यान, कुठलाही पुरावा नसताना  छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. हा निव्वळ करंटेपणा असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. असा भयंकर मजकूर शालेय प्राथमिक पुस्तकात छापला जातो, हे राज्य सरकारचे दुर्दैव आहे, असेही संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.