संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख; संभाजी ब्रिगेडने शिक्षण आयुक्तांना दिली दारूची बॉटल भेट

211

पुणे, दि. ११ (पीसीबी) – सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात आज (गुरुवारी) आंदोलन करून दारुची बॉटल भेट दिली.

सर्व शिक्षा अभियानात ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकाचा समावेश असून हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा उल्लेख या पुस्तकात आहे.

या पुस्तकावरुन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात दारुच्या बॉटलसह धडक दिली. संतप्त कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले. मात्र, आयुक्त रजेवर असल्याने शेवटी कार्यकर्त्यांनी त्यांच्या पीएला दारुची बॉटल देत या घटनेचा निषेध केला.