संभाजी भिडे गुरूजींची इस्त्रो च्या प्रमुख पदी निवड करण्याची मागणी

197

पुणे, दि. १० (पीसीबी) – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक  अध्यक्ष संभाजी भिडे यांची  इस्त्रोच्या  प्रमुख पदी नियुक्ती करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे पुणे शहर सरचिटणीस परीक्षित तळोकार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडला कारण त्या दिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते.  त्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला,  असे  संभाजी भिडे यांनी म्हटले होते.  भिडेंच्या या विधानानंतर  तळोकार यांनी पंतप्रधान  मोदी यांना एक पत्र लिहून त्यांची इस्त्रोच्या प्रमुखपदी निवड करण्याची उपरोधिक मागणी केली आहे.

मी परीक्षित तळोकार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पुणे शहर सरचिटणीस पदी काम करतो. या पत्राद्वारे मी सांगलीतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ  संभाजी भिडे गुरूजी यांची   इस्त्रो च्या प्रमुख पदी तात्काळ नियुक्ती करावी, यासाठी मी पत्र लिहीत आहे, असे परीक्षित तळोकर यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने एकादशीला यान सोडल्याने त्यांचा प्रयोग यशस्वी झाला, असे मत संभाजी भिडे  यांचे असेल तर   भारताच्या उज्वल भविष्यासाठी  भिडे यांची नियुक्ती करण्यात यावी, असे परीक्षित तळोकार म्हणाले आहेत.