संभाजी भिडेंना रोखा नाहीतर महाराष्ट्रात कठुआ व उन्नावसारख्या घटना घडतील अशी भीती समाजसेवक तुषार गांधी यांनी व्यक्त केली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेंचा काय संबंध होता याची चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी करताना मुख्यमंत्री त्यांना कशी काय क्लीन चीट देऊ शकतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

उन्नाव व कठुआ येथे घडलेल्या भयानक घटनांचा दाखला देत तुषार गांधी व माजी पोलीस अधिकारी शिरीष इनामदार यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि महाराष्ट्रासह देशामध्ये विखारी विचारसरणी लोकांच्या मनामध्ये भिनवली जात असल्याचा आरोप केला. ज्यावेळी राजकीय उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी अन्य समाजाच्या संदर्भात लोकांच्या मनात विष पेरले जाते त्यावेळी उन्नाव व कठुआसारख्या घटना घडतात असे इनामदार म्हणाले. कुठल्याही प्रकरणात क्लीन चीट पोलीस किंवा न्याय यंत्रणा देऊ शकते, मग याच प्रकरणी मुख्यमंत्री कसे काय क्लीन चीट देतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

भीमा कोरगाव प्रकरणी दोन अडीच महिन्यांपासून वातावरण तापवले जाते, हजाराच्या वर तरूण जमतात, त्यातलेच २५० जण दुसऱ्या ठिकाणी रवाना होतात आणि या सगळ्याचा गुप्तचर यंत्रणांना पत्ता असू नये हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश असल्याची टीकाही इनामदार यांनी केली. अशा प्रकारचे अपयश हे महाराष्ट्रातले पहिलेच असल्याचेही त्यांनी सांगितले.