संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती उत्सहात साजरी

95

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने सलग चौथ्यावर्षी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती त्रिवेणी हॉस्पिटल वाल्हेकरवाडी चिंचवड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मराठावाडा जनविकास संघांचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्रिवेणी हॉस्पिटल चे संचालक डॉ मोहन पवार व डॉ अश्विनी पावर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ अदिती कुलकर्णी, डॉ सदाशिव देशपांडे तसेच इतर तज्ञ् डॉक्टरांच्या सहकार्याने हे मोफत आरोग्य शिबीर पुढील तीन दिवस त्रिवेणी हॉस्पिटल वाल्हेकरवाडी येथे सुरु राहणार आहे. या शिबिरामध्ये प्रामुख्याने महिलांसंबंधित सर्व आजार व उपचार करून यामध्ये संभाजी ब्रिगेड च्या वतीने पाच लाख रुपये पर्यंत शस्त्रक्रियेचा खर्च करण्यात येणार आहे असे संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष सतीश काळे यांनी सांगितले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले दरवर्षी प्रमाणे जिजाऊ जयंतीच्या माध्यमातून सर्वसामान्य गरजू नागरिकांपर्यंत या शिबिराचा हेतू पोहचला पाहिजे तसेच यातून सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांचा फायदा व्हावा याच उद्देशाने हा उपक्रम डॉ मोहन पवार यांच्या सहकार्यातून घेतला जात आहे.

तसेच मराठा सेवा संघांचे गजानन आढाव यांनी ही जिजाऊ यांच्या कार्याला उजाळा दिला आणि आजची प्रत्येक स्त्री ही उद्याची जिजाऊ झाली पाहिजे अशी भावना व्यक्त केली.

यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हा संघटक ज्ञानेश्वर लोभे, शहर उपाध्यक्ष संजय जाधव, बीएसपी चे महेश कांबळे, राजेंद्र पवार तसेच छावा चे गणेश सरकटे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी समारोप करताना आभार डॉ मोहन पवार यांनी मानले.