संपूर्ण देश पुरग्रस्त केरळच्या पाठीशी उभा आहे; मोदींचा ‘मन की बात’मधून विश्वास

113

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) ४७ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित करताना देशवासीयांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जन्माष्टमी आणि शिक्षक दिनाच्याही त्यांनी शुभेच्छा दिल्या. भीषण पूरपरिस्थितीचा सामना करणाऱ्या केरळचा उल्लेख करताना मोदींनी बचाव कार्यात मदत करणाऱ्या नौदल, एनडीआरएफ आदी सर्व जवानांचे कौतुक केले. संपूर्ण देश केरळच्या पाठीशी उभा आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला.  १६ ऑगस्ट रोजी वाजपेयींच्या निधनाची बातमी आल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता, असे ते म्हणाले. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी मध्यप्रदेशच्या मंदसौरमध्ये अत्यंत कमी वेळात दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. तीन तलाकच्या मुद्द्यावरही भाष्य करताना  मोदी यांनी मुस्लिम महिलांना विश्वास देताना म्हटले की, संपूर्ण देश तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी तुमच्या बाजूने उभा आहे.

प्रत्येक भाषेचे वेगळे महत्त्व असते. तामिळ जगातील सर्वात जुनी भाषा असल्याचा देशाला गर्व आहे. तसेच संस्कृत भाषाही तितकीच महत्त्वाची  असल्याचे सांगून मोदींनी भाषेचे महत्त्व   अधोरेखित केले. या पावसाळी अशिवेशन लोकसभेत ११८ टक्के आणि राज्यसभेत ७४ टक्के कामकाज झाले.  यंदा लोकसभेत २१ तर राज्यसभेत १४ विधेयक मंजुर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. छोट्या छोट्या गावातील खेळाडूंना भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळत आहे, हे पाहून आनंद वाटतो, असे मत  मोदी यांनी व्यक्त केले.

येत्या २९ तारखेला राष्ट्रीय खेळ दिन आहे. दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले आणि उर्वरित खेळांसाठी सहभाग घेतलेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.