संदेशांचे मूळ शोधणे हे यूजर्सच्या गोपनीयतेला धक्का पोहचवणारे – व्हॉट्सअॅप

154

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – अफवा रोखण्यासाठी संदेशांचे मूळ शोधणारी प्रणाली उपलब्ध द्यावी, ही केंद्र सरकारची मागणी ‘व्हॉट्सअॅप’ने फेटाळून लावली आहे. संदेशांचे मूळ शोधणे हे यूजर्सच्या गोपनीयतेला धक्का पोहोचवणारे ठरेल, अशी भूमिका कंपनीने घेतली आहे.

अफवांच्या प्रसाराचे सर्वाधिक वेगवान माध्यम ठरणाऱ्या ‘व्हॉट्सअॅप’ला आपल्या यंत्रणेत तांत्रिक बदल करण्याचा आग्रह केंद्र सरकारने धरला आहे. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी कंपनीप्रमुख ख्रिस डॅनिअल्स यांच्याकडे संदेशांवर लक्ष ठेवणारी यंत्रणा भारतात उभारण्याची मागणी केली होती. मात्र, ‘व्हॉट्सअॅपवरील संवाद गोपनीय व संवेदनशील असतात. अशा संवादांचे मूळ शोधल्यास यूजर्सची गोपनीयता राखण्याच्या खासगीपणा संरक्षण उद्देशाला धक्का पोहोचेल,’ असे कंपनीने म्हटले आहे.

अफवा रोखण्यासाठी लोकशिक्षण देणे हाच यावरील पर्याय असल्याची भूमिका कंपनीने मांडली आहे. अफवांच्या प्रसारातून जमावाकडून होणारी मारहाण व हत्येसारखे गुन्हे रोखण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्सअॅप कंपनीला आपल्या प्रणालीत सुधारणा करण्याचा आग्रह धरला आहे. कंपनीप्रमुख ख्रिस डॅनिअल्स यांच्याशी झालेल्या चर्चेत केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी यासाठी संदेशाचे मूळ शोधणारी यंत्रणा प्रस्थापित करण्यास सांगितले होते. मात्र कंपनीने यास नकार दर्शवला आहे. दोन व्यक्तींमधील संवेदनशील संवादांवर पाळत ठेवल्यास त्यातून गोपनीयतेचा भंग होईल व कंपनीच्या खासगीपणा जपण्याच्या धोरणाला धक्का बसेल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. याशिवाय अफवांचा प्रसार रोखण्यासाठी लोकशिक्षण हाच प्रभावी उपाय आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.