संत साहित्याचे मूळ भगवद् गीताच : रामचंद्र देखणे

77

– संत संत वाड्मय पुरस्कार वितरण

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) : महाराष्ट्रातील गावागावात संत साहित्य वाचले जाते, संत साहित्याचे मूळ भगवद्गीताच आहे, ओवी, अभंग, गवळणी, पदे यातून संतांनी आपले विचार समाजाला दिले, संत साहित्यांची लोकाभिमुखता,रसाळ भाषा आणि कवित्वातून परतत्वाचा स्पर्श होतो, असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

निगडी प्राधिकरण येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्यावतीने संत वाड्मय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. मनोहर वाढोकार सभागृहात झालेल्या सोहळ्यास संस्थेचे प्रमुख नितीनभाई कार्या, कार्यवाह यशवंत लिमये, उपक्रम संयोजक सुधीर कुलकणी, परिक्षक डॉ. कल्पना काशिद उपस्थित होते.

डॉ. देखणे म्हणाले, ‘‘ज्ञानप्रबोधिनी हे माझे माझघर आहे. अभ्यंकर भाऊंनी सुरू केलेल्या उपक्रमास २३ वर्षे पूर्ण झाली आहेत. मोठ्या निष्ठेने हा उपक्रम सुरू आहे. वैश्विक वाड्मयात मराठी साहित्याचे आणि मराठीत संत साहित्याचे वेगळे स्थान आहे. संत साहित्याला वाचक आहे. संत साहित्यात आणखी संशोधन व्हायला हवीत. संत साहित्याचा जन्म भगवद्गीतेतून झाला. मराठीचे काय होणार अशी चिंता पुण्यातील काहीजणांना असते. मात्र, मराठी भाषा ही समृद्ध आहे. माऊंलीनी बोलीभाषेला प्रमाण भाषेचा दर्जा दिला.’’

महाराष्ट्रात राजसत्ता नव्हती. परकीयांकडून होणारे अन्याय, अत्याचार, भ्रष्टचार, दुराचाराने समाज पोखरला असताना, चैतन्य हरविले असताना त्या समाजास आत्मनिर्भरता देण्यासाठी संतचळवळ उभी राहिली. देशभाषेची प्रतिष्ठा जपण्यासाठी भक्तीपंथाचा उदय झाला होता.

यावेळी मेधा कुलकर्णी, स्रेहल तावरे, चंद्रकोत पोतदार, ज्योती रहाळकर यांनी मनोगते व्यक्त केली.
सुधीर कुलकर्णी म्हणाले, ‘‘चिंतनपर, विवेचनपर, संत जीवन ललित वाड्.मय प्रकारातील पुस्तकांना हे पुरस्कार दिले. त्यासाठी एकूण २४ पुस्तके आली होती. सलग २३ वर्षे उपक्रम सुरू आहे.’’ कार्यवाह यशवंत लिमये यांनी उपक्रमागील भूमिका विषद केली. यांनी सूत्रसंचालन केले.

निकाल पुढील प्रमाणे, चिंतनपर, विवेचनपर विभागात डॉ. मेघा गोसावी यांच्या ‘‘सद्गुरू अच्युताश्रम स्वामी कृत अभंगगाथा (स्नेहवर्धन प्रकाशन), तर गोविंद व मंदाकिनी खिरे (पुणे) यांच्या मधुश्री प्रकाशनाच्या श्री नाथ भागवत या पुस्तकास द्वितीय पुरस्कार दिला.

ज्ञानज्योती ओवी पुन्हा नव्यानी या डॉ. ज्योती रहाळकर (पुणे) यांच्या पुस्तकाचा तसेच दशग्रीव रावण एकादशमुखी हनुमान, चिरंजीव अंजनीसुत हनुमान व रामायण या डॉ. दिलीप साठे यांच्या पुस्तकाचा व जो संती वसविला ठावो या शिरीष शांताराम कवडे (पुणे) यांना विशेष पुरस्कार देण्यात आला.
संत जीवन ललित वाड्.मय प्रकारात डॉ. चंद्रकांत पोतदार लिखित आणि चंद्रकांत जोशी प्रकाशित सृजनगंध या पुस्तकास प्रथम, चपराक प्रकाशनाच्या महाराष्ट्राचे विचारदुर्ग या रमेश वाघ यांच्या पुस्तकास दुसरा तर, तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार वेदान्तश्री प्रकाशनाच्या ओळख वेदांची या प्रा. डॉ. शरद कुळकर्णी यांच्या पुस्तकास दिला आहे.