संत निरंकारी मंडळातर्फे पिंपरी-चिंचवड मधील ६०० कुटुंबाना मदत

136

पिंपरी, दि.६ (पीसीबी) – कोरोना व्हायरस या आजाराने महाराष्ट्रात शिरकाव केला असल्यामुळे सर्वच यंत्रणा हैराण झाल्या असून या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केंद्र व राज्यशासनाने १४४ कलम लागू करत २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला. सर्वसामान्य कुटूंबात महिन्याकाठी येणाऱ्या पगारावर घराचा गाडा चालत असतो त्यामुळे सध्या आवक थांबल्याने या कुटूंबांना मोठी झळ पोहचली आहे तर हातावर कमवून रोजचा गाडा चालविणाऱ्या कुटूंबाच्या मदतीला राज्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, संस्था पुढे सरसावल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

निरंकारी सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असिम कृपाशीर्वादाने, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार पुणे जिल्ह्यातील भोसरी, पिंपरी, काळेवाडी, मोरेवस्ती, बालाजीनगर, दिघी, आळंदी, चऱ्होली, शिक्रापूर, चाकण,खेड, जनता-वसाहत, गोकुळनगर, भोर, खडकी, जय-जवान नगर येथील ६०० हुन अधिक गरजू कुटुंबाना गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, मीठ, मसूर-डाळ या पॅकेटचे वाटप करण्यात आले. जेव्हा समाजावर नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा निरंकारी मिशनचे सेवादार सेवेसाठी तत्पर असतात. गेल्या वर्षी अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानाच्या वेळी निरंकारी मिशनचे सेवादार सेवेसाठी धाऊन गेले होते.

प्रशासन-डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात येत असून सोशल डिस्टंसिंग कडे विशेष लक्ष देत स्वयंसेवकांनी स्वतः मास्क,हॅन्डग्लोस चा वापर करून धान्य वाटप केले. हा जीवघेणा आजार आहे या आजारापासून दूर राहायचे असेल तर सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वतःला, परिवाराला, शहराला या आजारापासून दूर ठेवण्यास मदत करण्यासाठी घरातच थांबून सहकार्य करा असा सल्ला यावेळी स्वयंसेवकांद्वारे देण्यात आला.

WhatsAppShare