संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त लोणावळा-खंडाळा येथे वृक्षारोपण

63

लोणावळा, दि. ६ (पीसीबी) जागतिक पर्यावरण दिनाच्या उद्देशपूर्तीसाठी आपले सक्रीय योगदान देताना संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे  लोणावळा आणि खंडाळा येथे  स्वच्छता अभियान व वृक्षारोपण करण्यात आले.

मुंबई -पुणे महामार्गाचे दोन्ही बाजूचे रस्ते, खंडाळा ते अमृतांजन पॉईंट, वलवन तळे, कावेरी फार्म, नागरगाव, लोहगड उद्यान, रायवूड ते लोणावळा डॅम गेट, आय.एन.एस. ते भुशी, तुंगार्ली चौक ते ग्रामीण पोलीस स्टेशन, नगरपरिषद कार्यालय, मावळा पुतळा अशा विस्तृत परिसरामध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. तसेच कचऱ्याबरोबरच प्लास्टिक पिशव्यांचा कचरा यावेळी गोळा करण्यात आला.

संत निरंकारी मिशनच्या पुणे झोनमधील २००० हुन अधिक स्वयंसेवक या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे निळेटी-शर्ट व टोपी घातलेले स्वयंसेवक संत निरंकारी सेवादलाचे खाकी गणवेषातील पुरुष व निळ्या गणवेषातील महिला स्वयंसेवक आणि सर्वसामान्य निरंकारी भक्तगण यांचा समावेश होता. स्वच्छतेबरोबरच याअभियानाअंतर्गत लोणावळा बसस्थानक परिसर व ठोंबरेवाडी येथे २००पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली.या अभियानामध्ये फाऊंडेशनच्या युवाकलाकारानी “प्लास्टिक प्रदूषणसमाप्त करूया” या विषयावर पथनाट्यसादर करून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण केली.

संत निरंकारी मंडळाचे मानव संसाधन विभागाचे अतिरिक्त मेंबर इंचार्ज एस.एल.गर्ग, मंडळाच्या पुणे झोनचे प्रभारी  ताराचंदजी करमचंदानी, मंडळाचे साऊथ रिजनल संचालक  शुभकरणजी आणि पुणे विभागाचे सेवादल क्षेत्रीय संचालक  किशनलाल अडवाणी याप्रसंगी उपस्थित होते.

या अभियानासाठी लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा  सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष  श्रीधर पुजारी, आरोग्य सभापती  वृंदा गणत्रा, मुख्याधिकारी  सचिन पवार व इतर नगरसेवक यांनी आवर्जून उपस्थित राहून स्वच्छता मोहिम राबविण्यास सहकार्य केले. पुणे क्षेत्रीय प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी आभार मानले.