संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीच्या विठू सावळ्याच्या भेटीसाठी देहूतून प्रस्थान

33

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पंढरीत बसलेल्या विठू सावळ्याच्या भेटीची आस लागलेल्या लाखो वैष्णवांच्या भक्तिकल्लोळात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने गुरूवारी (दि. ५) दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा-माऊली तुकाराम असा अखंड घोष अन् टाळ-मृदंगाचा गजर करीत वैष्णवांनी प्रस्थान सोहळ्यात हरि भक्तीचे रंग भरले. पालखी प्रस्थानाच्या वेळी पावसानेही हजेरी लावल्याने वारकरी आणखीनच सुखावले. दरम्यान, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी शुक्रवारी (दि. ६) आळंदीतून प्रस्थान ठेवणार आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी अलंकापुरीत लाखोच्या संख्येने वारकरी दाखल झाले आहेत.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी गुरूवारी पहाटेपासूनच देहूनगरीत उत्साही वातावरण होते. पहाटे मुख्य मंदिर व शिळा मंदिरात पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे, विठ्ठल मोरे, अशोक मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. त्यानंतर विविध धार्मिक विधी संपल्यानंतर सकाळी दर्शनबारी सुरू करण्यात आली. दर्शनाला जाण्यापूर्वी स्नान करण्यासाठी भल्या पहाटेच इंद्रायणीचा काठ वैष्णवांनी फुलून गेला होता. सकाळी दहाच्या सुमारास सप्ताह काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुका आणून महापूजा करण्यात आली. महापूजा सुरू असताना मंदिर आणि परिसरात विठोबा-तुकारामाच्या जयघोषाचा आवाज टिपेला पोचला. भजन-कीर्तनाचा अखंड नाद, साऱ्यांनीच भान हरपून धरलेला फुगड्यांचा फेर, टाळ-मृदुंगांचा लयबद्ध आवाज शिवाय रिमझिम पाऊस अशा भरलेल्या वातावरणात मानकऱ्याने परंपरेप्रमाणे पादुका डोक्यावर घेऊन वाजत-गाजत मुख्य मंदिरातील भजनी मंडपात त्या आणल्या.

त्यानंतर प्रस्थान सोहळ्यास सुरूवात झाली. पालखी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आली आणि महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी झाली.  या सोहळ्यास पालकमंत्री गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार बाळा भेगडे, माजी आमदार बबनराव पाचपुते आदी उपस्थित होते. पादुकांची पूजा सुरू असतानाच दुसरीकडे मंदिराच्या आवारामध्ये टाळ-मृदंगाचा गजर सुरू झाला. त्याबरोबरीने वारकऱ्यांचे विविध खेळही रंगले. वारकऱ्यांनी फुगडीचा आनंद लुटला. पालखी प्रस्थानाची तुतारी वाजली अन् पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, असा घोष करत देहूकरांनी पालखी खांद्यावर घेतली. त्यामुळे वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले.

देऊळवाड्याची प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी पहिल्या मुक्कामासाठी इनामदारवाड्यात आजोळघरी पोहोचली. तुकोबांच्या पालखी शुक्रवारी (दि. ६) सकाळी पिंपरी-चिंचवडच्या दिशेने प्रस्थान ठेवेले आणि सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात पालखीचे आगमन होईल. तेथे महापालिकेच्या वतीने पालखीचे आणि दिंडीप्रमुखांचे स्वागत झाल्यानंतर पालखी आकुर्डीच्या विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ होईल. येथे मुक्काम झाल्यानंतर शनिवारी (दि. ६) पालखी पुण्यात दाखल होईल.

दरम्यान, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे शुक्रवारी (दि. ६) आळंदीतून प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक अलंकापुरीत दाखल झाले आहेत. सोहळ्यातील श्रींच्या अश्वाचे शाही लवाजम्यासह आगमन झाले आहे.