संतापजनक: हिंजवडीत मजुराला मानवी विष्ठा चारुन जबर मारहाण

137

हिंजवडी, दि. १५ (पीसीबी) – उलट उत्तर दिल्याच्या कारणावरुन वीटभट्टी मालकाने एका मजुरास मानवी विष्ठा चारुन जबर मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. १३) दुपारी दोनच्या सुमारास मुळशी तालुक्यातील जांबे येथे घडली.

याप्रकरणी सुनील अनिल पवळे (वय २७, रा. जांबे. मूळ रा. उस्मानाबाद) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वीटभट्टी मालक संदीप पवार (रा. जांबे, मुळशी) याच्यावर अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील हे आरोपी संदीप याच्या वीटभट्टीवर मजुरी म्हणुन काम करतात. बुधवारी दुपारी काम झाल्यानंतर सुनील यांनी जेवण केले आणि त्यांची आई, वडील, आजी, आजोबा असे चौघेजण गप्पा मारत बसले होते. त्यावेळी संदिपने त्यांना कामाला सुरुवात करण्यास सांगितले. त्यावर सुनील यांनी ‘आत्ताच जेवण केले आहे, थोडे बसतो आणि मग कामाला सुरुवात करतो’ असे सांगितले. यावर संदीप यांना सुनील यांचा राग आला आणि त्यांनी ‘तुम्हाला माज आला आहे’ असे बोलून शिवीगाळ केली. तसेच त्याच्या पत्नीला मानवी विष्ठा आणण्यास सांगितले आणि ती विष्ठा सुनील यांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी देत खाण्यास सांगितले. याप्रकरणी संदीप विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.