संतापजनक: पेन्शनमध्ये भागीदारी न दिल्याने मुलाने केली आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या

119

बिहटा, दि. १९ (पीसीबी) – पेन्शनमध्ये भागीदारी दिली नाही म्हणून मुलाने आपल्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१७) मध्यरात्रीच्या सुमारास बिहारमधील बिहटा येथे घडली.

मुनारिका यादव (वय ७०) आणि पत्नी रामसुंदरी देवी (वय ६०) असे हत्या झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. अवधेश यादव (वय ४०) असे स्वत: च्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. तो सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेचे निवृत्त कर्मचारी राहिलेले मुनारिका यादव यांनी आपला लहान मुलगा अवधेश यादव याला पेन्शनमधील हिस्सा नाकारला होता. मुनारिका यादव हे आपल्या पत्नीसह मोठा मुलगा रमेश याच्या घरी राहायचे, त्यांना दरमहिन्याला १५ हजार रुपये पेन्शनच्या स्वरुपात मिळत होते. हा पैसा ते मोठा मुलगा रमेश याच्या घरखर्चावर आणि आपल्या नातवंडांवर खर्च करायचे. त्यामुळे अवधेश संतापला होता. अवधेश हा तेथून जवळच राहायचा. मंगळवारी त्याचे पेन्शनच्या पैशांवरुन वडिलांसोबत भांडण झाले होते, त्यानंतर रात्री उशीरा अवधेश हा रमेशच्या घराजवळ आला आणि घराबाहेर झोपलेल्या आई-वडिलांवर त्याने गोळीबार केला. गोळीच्या आवाजाने रमेश आणि परिसरातील लोक जागे झाले आणि त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेतील वृद्ध दांपत्यांना पाहिले. त्यानंतर सर्वांनी अवधेशचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण रात्रीची वेळ असल्याने तो पसार झाला.