संतापजनक: राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तरुणीवर १२ जणांनी केला सामूहिक बलात्कार

3592

चंदीगड, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त एका १९ वर्षीय तरुणीवर १२ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना हरियाणातील रेवाडी येथे घडली. मात्र आरोपींवर कारवाई करण्याऐवजी पोलिस हद्दीचे कारण देऊन पिडीतेच्या कुटूंबीयांना मानसिक त्रास देत आहेत.   

याप्रकरणी पीडित कुटुंबाने रेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्याऐजी, कुटुंबाला हद्दीचे कारण दिले. त्यांना महेंद्रगढमधील कनीना ठाण्यात खटला दाखल करण्यास सांगितले.  तिकडे गेल्यावर कनीना पोलिसांनीही ती हद्द आमची नसल्याचे सांगत, परतवून लावले.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय तरुणी रेल्वेच्या परीक्षेची तयारी करते. त्यासाठी ती क्लासला जात होती, त्यावेळी गावातीलच तीन जण पंकज, मनीष आणि निशू यांनी तिचे अपहरण केले. या तिघांनी तरुणीला महेंद्रगढ आणि झज्जर जिल्ह्याच्या सीमेवरील शेतात, एका विहिरीजवळ घेऊन गेले. तिथे आणखी काही नराधम आधीच हजर होते. दारुच्या नशेत असलेल्या १२ जणांनी  तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. या सर्व पाशवी कृत्यानंतर नराधमांनी पीडित तरुणीला बेशुद्ध अवस्थेत सोडून पोबारा केला. एका आरोपीने पीडित तरुणीच्या घरी फोन करुन, तुमची मुलगी बेशुद्ध अवस्थेत असल्याचे सांगितले. या फोननंतर कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, समोर जे चित्र होते, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

दरम्यान, पिडीत तरुणी सीबीएसई बोर्डाची टॉपर होती. इतकेच नाही तर २६ जानेवारी २०१६ मध्ये तिला राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आले होते.  यामुळे अशा कर्तृत्ववान मुलीवर बलात्कार झाल्याने देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. तसेच आरोपींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.