संजय दत्त निरपराध असल्याचे बाळासाहेब ठाकरे मला एकदा म्हणाले होते – नितीन गडकरी

56

मुंबई, दि. १० (पीसीबी) – पेनची ताकद एखाद्या अणू बॉम्बपेक्षाही जास्त विध्वंसक ठरु शकते. माध्यमे, पोलीस आणि न्यायालये यांचे मतेही एखाद्याच्या जीवनावर परिणाम करु शकतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित संजू सिनेमा पाहिल्यानंतर ते रविवारी नागपूरात एका सांस्कृतिक कार्यक्रमात बोलत होते. समाजातील कला आणि कलाकारांचे योगदान या विषयावर बोलताना संजू हा सिनेमा सुंदर सिनेमा असल्याचे त्यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले, मी सिनेमा पाहिला असून खरच तो खूपच सुंदर सिनेमा आहे. यामध्ये माध्यमे, पोलीस आणि न्यायव्यवस्था यांची मते एखाद्यावर कशा प्रकारे परिणाम करु शकतात हे दाखवण्यात आले आहे. सिनेमा पाहिल्यानंतर मी सुनिल दत्त आणि त्यांचा मुलगा संजय यांची परिस्थिती पाहून डिस्टर्ब झालो. एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही आपल्याला संजय दत्त पूर्णपणे निरपराध असल्याचे सांगितल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

मी नेहमी सांगतो की, माध्यमांनी बँक किंवा व्यक्तीबाबत माध्यमांनी लिहीताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण, अनेक काठिण्यातून आपल्या जीवनाला त्यांनी आकार दिलेला असतो. मात्र, एक छोटीशी गोष्टही त्यांचे जीवन उद्धवस्त करण्यास कारणीभूत ठरू शकते. पेनची ताकद ही एखाद्या अणू बॉम्बपेक्षाही मोठा विध्वंस घडवून आणू शकते.