संजय किर्लोस्करांची भावांविरोधात कोर्टात धाव; ७५० कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा

252

पुणे, दि. २ (पीसीबी) – ख्यातनाम उद्योगपती संजय किर्लोस्कर यांनी कुटुंबियांवर आर्थिक फसवणुकीचा आरोप करून कोर्टात दाद मागितली आहे. संजय हे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असून संपत्तीच्या वाटपासंदर्भात झालेल्या कराराचे पालन भावांनी केले नसल्यचा ठपका ठेवत त्यांनी ७५० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा ठोकला आहे.

आपले भाऊ अतुल व राहूल तसेच लांबच्या नात्यातले भाऊ विक्रम व दिवंगत गौतम कुलकर्णी यांचे कुटुंबिय यांनी कौटुंबिक कराराची पायमल्ली केल्याचा आरोप संजय यांनी पुणे सिव्हिल कोर्टात केला आहे. पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार कुणी कुठला व्यवसाय करायचा याची निश्चिती या करारामध्ये करण्यात आली होती, मात्र आपल्या भावांनी हा करार न पाळल्याने व त्यांना मज्जाव असलेला व्यवसाय त्यांनी केल्यामुळे आपल्याला ७५० कोटी रुपयांचा फटका बसल्याचे संजय किर्लोस्कर यांचे म्हणणे आहे.

शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्करांनी किर्लोस्कर समुहाची स्थापना केली व अनेक नामांकित उद्योग उभे केले. किर्लोस्कर कुटुंबाच्या मालकिच्या कंपन्या कुटुंबातच रहाव्यात, वेगवेगळ्या वंशजांनी त्या चालवाव्यात व आपसात स्पर्धा होऊ नये या उद्देशाने २००९ मध्ये कौटुंबिक करार करण्यात आला.