मराठा क्रांती मोर्चामध्ये फूट; महिलांची स्वतंत्र संघटना, मूळ संघटनेच्या कार्यपध्दतीचा निषेध

237

पुणे, दि. ४ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा निर्णायक वळणावर आला आहे. परंतु मराठा क्रांती मोर्चातील महिलांनी संघटनेच्या कार्यपद्धतीचा निषेध करत ‘सकल मराठा महिला क्रांती मोर्चा’ या नावाने स्वतंत्र राज्यस्तरीय समितीची स्थापना करत असल्याची घोषणा आज (मंगळवार) येथे केली.  

मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या निर्णय प्रक्रियेत महिलांना कोणतेही स्थान दिलेले नाही.  राज्यस्तरीय समित्यांमध्ये एकाही महिलेला घेतलेले नाही. संघटनेत लढा देणाऱ्या महिलांना डावलले जात आहे. याचा निषेध म्हणून आम्ही महिलांची राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे, अशी माहिती महिला क्रांती मोर्चाच्या उषा पाटील आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी  यावेळी दिली.

गेल्या दोन वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरात लाखोंच्या संख्येने मराठा समाजाने शिस्तबद्ध मोर्चे काढले आहेत. त्याच संघटनेत आता महिलांनी स्वतंत्र समिती स्थापन केल्याने फूट पडली आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेतच काही मराठा महिलांनी नव्याने स्थापन केलेल्या राज्यस्तरीय समितीला विरोध दर्शवून घोषणाबाजी केली. बहुसंख्य महिला सहकाऱ्यांना अंधारात ठेवून, उषा पाटील यांनी कोणत्या अधिकारात राज्यस्तरीय महिला क्रांती मोर्चा समितीची घोषणा केली, याचा खुलासा करण्याची मागणी विरोधक महिलांनी पत्रकार परिषदेत केली. यामुळे महिलांमध्येही एकवाक्यता नसल्याचे दिसून आले.

उषा पाटील म्हणाल्या की, मोर्चाचे नेतृत्व महिला करतात, निवेदने महिलांचे शिष्टमंडळ देते, महिलांचा खूप मोठा सहभाग मोर्चात असतो, पण महिलांना अपेक्षित स्थान दिले जात नाही. समन्वयकपदी महिलांना स्थान नाही. हे अपमानास्पद आहे. त्यामुळे राज्यभरातील महिलांना एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे. मूळ संघटनेत फूट पाडण्याचा किंवा स्त्री-पुरुष वादाचा मुद्दा यामागे नाही.