“संकटात असणाऱ्या महाराष्ट्राला राजकीय रणांगण बनविणे हे कुठले शहाणपण?”

76

मुंबई,दि.२२(पीसीबी) – संकटात असणाऱ्या महाराष्ट्राला राजकीय रणांगण बनविणे हे कुठले शहाणपण? असा सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर टिका केली आहे.

कोरोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने ‘माझे अंगण, माझे रणांगण’ या आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्यभरातील भाजपाचे महत्वाचे नेते करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात ठाकरे सरकार कमी पडत असल्याचा आरोप करत रस्त्यावर आले आहेत. याच भाजप कार्यकर्त्यांचा बाळासाहेब थोरात यांनी समाचार घेतला आहे. संकटात असणाऱ्या महाराष्ट्राला राजकीय रणांगण बनविणे हे कुठले शहाणपण?, अशा शब्दात महाराष्ट्र भाजपवर बाळासाहेब थोरात यांनी टीकस्त्र सोडलं आहे. राजकारणासाठी आयुष्य पडलंय, आजची वेळ निर्धाराने आणि एकजुटीने लढण्याची आहे, इतिहास भाजपची ही काळी कृती कधीही विसरणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान देशातील 20 टक्के करोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने पहायला मिळत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकार आणि त्यांचे मंत्री आभासी जगात जगत असल्याचा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे. फडणवीसांच्या या टीकेला देखील थोरातांनी उत्तर दिलं आहे.

WhatsAppShare