शेतक-यांनो पशुधनाची काळजी घ्या – पार्थ पवार

69

पिंपरी, दि. 3 (पीसीबी): राज्यभर ठिकठिकाणी सुरु असलेल्या अवकाळी पावसात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यात देखील 10 तालुक्यांमध्ये शेळ्या, मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी मावळातील शेतक-यांना पशुधनाची काळजी घेण्याचे भावनिक आवाहन केले आहे. याबाबत पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे.
बुधवारी (दि.1) झालेल्या अवकाळी पावसामध्ये पुणे जिल्ह्यात जनावरांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. पुणे जिल्ह्यात पावसामुळे एका दिवसात तब्बल एक हजार 34 शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एका घराची पडझड झाली आहे.
मावळ तालुक्यात बुधवारी 54.03 मिलिमीटर पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसाने हवेत गारठाही भरला. पाऊस आणि थंडी असा दुहेरी संकटाचा शेतक-यांना सामना करावा लागत आहे. या गारठ्यामुळे मावळ तालुक्यातील दोन गावांमध्ये 36 मेंढ्या, शेळ्या मयत झाल्या.
याबाबत शेतक-यांना दिलासा देण्यासाठी पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे. ‘अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागात शेतीचे खूप नुकसान झाले आहे. मावळसह जिल्ह्यात पशुधन मोठ्या प्रमाणात दगावल्याच्या घटना घडल्या असून, पुढील दोन तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. शेतकरी बंधूंनी पशुधन दगवणार नाही ही काळजी घ्यावी. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असे पवार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे