“शेतकरी निवडणुकीत आपला पराभव करेल या राजकीय भयातून मोदींनी कृषी कायदे मागे घेतले”

49

मुंबई, दि.१९ (पीसीबी) : शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदींनी कृषी कायदे रद्द केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणालेत कि, ‘पंतप्रधानांनी सात वर्षात पहिल्यांदा देशातील जनतेचा आवाज ऐकला. पहिल्यांदा त्यांनी मन की बात ऐकली. दिल्लीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला. एक वर्षापूर्वीच ऐकलं असतं तर अनेकांचा जीव वाचला असता”, असं म्हणत त्यांनी मोदींना टोला ही लगावला आहे. मोदींनी नवीन कृषी कायदे रद्द करीत शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गेल्या दीड वर्षापासून देशातील शेतकरी विशेषतः पंजाब, हरियाणाचा शेतकरी तीन कृषी कायदे, काळे कायदे याविरुद्ध संघर्ष करतोय, आंदोलन करतोय. सरकारची भूमिका पहिल्यापासून आठमुठीपणाची होती. काही झालं तरी झुकणार नाही, काही झालं तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केलं. या संपूर्ण काळात 450 च्या आसापास शेतकऱ्यांचे मृत्यू झाले,आत्महत्या झाल्या. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारण्यात आलं. लाठ्याकाठ्या वापरण्यात आल्या. प्रचंड दबावाचं राजकारण करण्यात आलं. शेतकऱ्यांना आतंकवादी, पाकिस्तानी, खलिस्तानी अशा प्रकारच्या बाधा देण्यात आल्या. पण शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली ती इतकी परखड आणि अतिशय स्पष्ट होती की देशातील शेतकऱ्यांच्या भावनाही शेतकऱ्यांच्या पाठिशी राहिल्या आणि अखेर आज पंतप्रधानांना तीन काळे कायदे मागे घ्यावे लागले, असे संजय राऊत म्हणाले.

यात अर्थात राजकारण असायलाच पाहिजे. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपच्या पायाखालची जमिन सरकली. शेतकरी प्रचंड संतापला आहे, तो आपला पराभव करेल. या राजकीय भयातून सुद्धा हे तीन काळे कायदे मागे घेतले असावे. तरीही उशिरा का होईना पंतप्रधानांनी देशाचा आवाज ऐकला त्यांचं मी स्वागत करतो. 13 राज्यातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यानंतर महागाई, 5 रुपये का होईना पेट्रोलचा दर कमी झालाय. आता ही शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे आग परसरत जाईल. म्हणून हे काळे कायदे मागे घेतलेले आहेत. ही राजकीय पावलं जरी असली तरीसुद्धा हा शहाणपणा सुचला, त्याचं कौतुक करतो, असेही राऊत म्हणाले.

या सर्वामध्ये शेतकऱ्यांचा विजय तर झालाच. पण या शेतकऱ्यांच्या निमित्ताने देशातील विरोधी पक्ष एकवटला. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहिला. दिल्लीमध्ये राहुल गांधीच्या, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढाई लढलेलो आहोत. आता जय-परजयाचा विचार न करता शेतकऱ्यांचा विजय झाला. पण त्यासाठी शेतकऱ्यांना मोठं बलिदान लागलं हे दुर्दैव आहे. पहिल्या दिवसापासून राहुल गांधी आपलं म्हणणं परखडपणे मांडत होते. संसदेतही आंदोलन करत राहिले शरद पवारही आपली भूमिका यामध्ये घेत राहिले. त्यामुळे हा सर्वांचा विजय आहे.

जनतेच्या दबावामुळे सरकारला तीन काळे कायदे मागे घ्यावे लागले त्याचप्रमाणे एक सरकारला ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स यांच्या मनमानीला चाप लावावा लागेल, एवढा जनतेचा रेटा वाढेल. तसेच राजकीय विरोधकांना कुचलण्याचे काम सुरु आहे त्याबाबतही जनतेच्या दबावापुढे सरकारला झुकावं लागेल, असे राऊय यांनी सांगितले.

WhatsAppShare