शेतकरी आत्महत्या नेमकी कशामुळे? सरकारची अचंबित करणारी उत्तरे!

20

नागपूर, दि.१४ (पीसीबी) – राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु असताना या आत्महत्या वाटत नसल्याचे त्यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून दिसून येत आहे. कारण, कर्जबाजारीपणामुळे १ मार्च २०१८ ते ३१ मे २०१८ या तीन महिन्यात तब्बल ६३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, यातील १२२ प्रकरण सरकारच्या निकषात बसत असल्याने ती अपात्र ठरवण्यात आली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून कुठलीही मदत मिळणार नाही.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिलेल्या लेखी उत्तराने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या जखमेवर मिठ चोळण्याचेच काम केले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत की मृत्यू हे सांगण्यासाठी सरकारने दिलेली कारणे अचंबित करणारी आहेत.

पहिल्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या यवतमाळमधील उमरखेड सावळेश्वर गावात १४ एप्रिल २०१८ माधवराव रावते या शेतकऱ्याने शेतात सरण रचून आत्महत्या केल्याचे वृत्त होते. पण सरकारने आत्महत्या नसल्याचे सांगितले. १४ एप्रिल रोजी माधवराव रावते दुपारी साडे बारा वाजता शेताच्या परहाटीच्या ढिगाऱ्यावर सावलीत बसून बिडी पेटवत होते, पण विस्तवाची ठिणगी पडल्याने ढिगाऱ्यावर पडल्याने ढिगाऱ्याला आग लागली आणि तोल जाऊन माधवराव आगीत पडले. यात भाजून त्यांचा अकस्मित मृत्यू झाला. माधवराव रावते यांना २९ नोव्हेंबर २०१७ ला कर्जमाफी देण्यात आली.

दुसऱ्या प्रकरणात यवतमाळ जिल्ह्यातील बोथबोडण गावातील सुंदरीबाई चव्हाण या विधवा महिलेने नांगरणीसाठी पैसे नाकारल्याने स्वत:ला जाळून घेतले. पण सरकारनुसार, सुंदराबाई चव्हाण त्यांच्या मुलाकडे आल्या होत्या. २ मे रोजी झोपेतून उठल्यावर केरोसिनचा दिवा अंगावर पडल्यामुळे त्या भाजल्या आणि उपचारादरम्यान ६ मे रोजी त्यांचा मृत्यु झाला. केरोसिनचा दिवा पडून भाजल्याने मृत्यु झाल्याचे कारण सरकारने विधानपरिषदेत दिले.

तिसऱ्या प्रकरणात यवतमाळमधील मौजे राजूरवाडी गावातील शंकर चायरे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहले होते. पण सरकारच्या मते, १० एप्रिल रोजी शंकर चायरे यांनी विष प्राशन करुन फाशी घेण्याचा प्रयत्न केला, पण दोर तुटल्याने ते खाली पडले. शासकीय महाविद्यालयाच दाखल करण्यात आले असताना त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी पंचनामा केला तेव्हा तुटलेली दोरी आणि मोनोसिल औषधांचा डब्बा आढळला.

या तीन प्रकरणात शंकर चायरे प्रकरण सरकारने पात्र ठरवले असून त्यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. पण माधवराव रावते आणि सुंदराबाई चव्हाण यांची आत्महत्या शेती विषयक कारणाने झाली नसल्याचे सांगत अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना सरकार दरबारी या आत्महत्यांकडे कशा पद्धतीने पाहिले जात असल्याचे या विधानपरिषद लेखी उत्तरातून दिसून येत आहे.