शीतयुध्दाची नांदी चीनवर नजर ठेवण्यासाठी अमेरिकेचे सैन्य दक्षिण आशियात

65

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) : भारत चीन सीमेवरचा वाद अद्याप निवळलेला नाहीय. त्यातच या घटनेनंतर अमेरिकेनं आशियाबाबत एक मोठा लष्करी निर्णय जाहीर केलाय. युरोपऐवजी आशियामध्ये अमेरिका सैन्य तैनाती वाढवणार आहे. या घटनेचा मोठा परिणाम जागतिक राजकारणावर होणार आहे, शिवाय ही नव्या शीतयुद्धाची नांदी आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतोय.

भारत चीन सीमेवरचा तणाव वाढलेला असतानाच आता चीनी ड्रॅगनवर नजर ठेवण्यासाठी अमेरिका आपलं सैन्य आशियात दाखल करणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो यांनी केलेल्या एका वक्तव्यात जागतिक राजकारणाचं बदलतं समीकरण दडलं आहे. युरोपमध्ये सैन्य कमी करुन अमेरिका आता दक्षिण पूर्व आशियात आपलं सैन्य वाढवणार आहे. चीनच्या पब्लिक लिबरेशन आर्मीनं काही आगळीक केल्यास त्याला उत्तर म्हणून हे करावं लागतंय, असा थेट इशारा ट्रम्प यांच्या विदेश मंत्र्यांनी दिला आहे.

अमेरिका सध्या जर्मनीतलं आपलं सैन्य कमी का करतेय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर उत्तर देताना माईक पोम्पियो यांनी आपले इरादे स्पष्ट केले. चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या हरकतींमुळे भारत, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, साऊथ चायना सी मध्ये धोका वाढलाय. त्यामुळेच योग्य वेळ आल्यावर चीनला उत्तर देण्यासाठी म्हणून ही तैनाती गरजेचं असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय.

भारत-चीन सीमेवर 6 मे पासून वाद सुरु झाला. सीमेवरच्या कुठल्याही वादात भारतानं त्रयस्थाची गरज नाही, अशी भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे. अमेरिकेनंही आत्तापर्यंत या वादात भारताची बाजू घेणारं कुठलं वक्तव्य केलेलं नव्हतं. पण आता मात्र दक्षिण आशियातल्या एकूण स्थितीवरुन अमेरिकेनं चीनवर नजर ठेवणं आवश्यक असल्याचं म्हटलंय. साहजिकच जर का भारत चीनमध्ये ठिणगी पडली तर आपल्या बाजूनं कोण उभं राहणार या प्रश्नाचं उत्तर त्यामुळे अमेरिका असणार का ही देखील चर्चा सुरु झालीय.

जर्मनीमध्ये आत्तापर्यंत अमेरिकेची 30 हजार लष्करी पथकं तैनात होती. त्यातली जवळपास दहा हजार पथकं अमेरिका माघारी बोलावतेय. दक्षिण आशियात पाय रोवण्यात अमेरिका कुठला दानधर्म करत नाहीय. त्यांनाही स्वत:चे काही फायदे वसूल करायचे आहेतच. त्यामुळे अमेरिकेच्या या लष्कर तैनातीमुळे एक नवं शीतयुद्ध सुरु होतं का, हे पाहावं लागेल.कोरोनानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट चीनविरोधात जाहीर वक्तव्यं केली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेलाही त्यांनी चीनवरुन सुनावलं. शिवाय हाँगकॉँगमधल्या चीनच्या दडपशाहीबद्दलही अमेरिका वारंवार निषेध नोंदवत आलीय. त्यात भारत-चीन सीमेवरच्या रक्तरंजित घटनेनं अमेरिकेला पुन्हा चीनविरोधात उभं राहण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे उद्या जर भारत चीनमध्ये काही विपरीत घडलंच तर त्यानिमित्तानं दक्षिण आशियाच्या राजकारणात अमेरिका हस्तक्षेप केल्याशिवाय राहणार नाही. अमेरिकेची आशियातली सैन्य तैनाती हे त्याचंच निदर्शक म्हणावी लागेल.

WhatsAppShare