शिवाजी महाराजांच्या पावलावर जगणारा समाज तयार करायचा आहे – संभाजी भिडे

123

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळादेखील स्थापन करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा. छत्रपती शिवाजी महाराज हिंदू व्रत घेऊन जगले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जगणारा समाज शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून तयार करायचा असल्याचे शिव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी म्हटले आहे. धारकऱ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केले.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठया संख्येने शिवप्रतिष्ठानचे धारकरी जंगली महाराज मंदिरात एकत्रित आले होते. त्यापूर्वी संभाजी भिडे गुरुजी यांनी उपस्थित धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. भगवे फेटे परिधान करून धारकरी सहभागी झाले होते.

यावेळी संभाजी भिडे गुरुजी यांनी धारकऱ्यांनी जुलै महिन्यात रायगडावर एकत्र येण्याचे आवाहन केले. ‘शिवप्रतिष्ठानच्या वतीने रायगडावर साकारण्यात येणार्‍या ३२ मन सोन्याच्या सिंहासनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील तीन हजार धारकऱ्यांच्या तुकड्यांनी जुलै महिन्यात किल्ले रायगडावर एकत्र यावे’, असे संभाजी भिडे गुरुजी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या कार्यासाठी फेसबुक आणि व्हॉट्सअप या फेकू माध्यमांकडे ढुंकून देखील बघू नका असे सांगितले.