शिवस्मारकाची उंची खुजी करण्याचा धंदा खपवून घेतला जाणार नाही- अजित पवार

111

नागपूर, दि. २१ (पीसीबी) – शिवस्मारकाची उंची कमी केली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील चर्चेदरम्यान दिले होते. मात्र विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी तुम्ही १५ वर्षांत काय केले, परवानग्याही घेतल्या नाही, असे सांगत मूळ प्रश्नाला बगल दिली होती. आता या सर्व प्रकरणाची वस्तुस्थिती समाजासमोर मांडायला हवी, असे विखे-पाटील म्हणाले. तर, सरदार वल्लभभाई पटेल यांचेच स्मारक उंच राहावे यासाठी शिवस्मारकाची उंची खुजी करण्याचा धंदा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला.

समुद्री वारेच नव्हे तर वादळांनाही टक्कर देईल अशा स्मारकाचा आराखडा आघाडी सरकारच्या काळात तयार करण्यात आला होता. त्यामुळे समुद्री वादळवाऱ्याचे कारण देत शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप आघाडी सरकारच्या काळातील छत्रपती शिवाजी महाराज समितीचे प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला. यावर, शिवस्मारकाबाबत सभागृहात आणि बाहेर विरोधकांकडून खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. यानंतर संतप्त विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांनी तर राजदंडालाच हात घातला. यामुळे विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दिक चकमक घडली. यातच सुरुवातीला दहा मिनिटांसाठी आणि दुसऱ्यांदा अर्ध्या तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. या गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास संपला. दरम्यान, सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी विधासभाध्यक्षांची माफी मागितली.