शिवसेनेला पाठींबा देणारे भाजपचे 3 बंडखोर नगरसेवक स्वगृही परतले; स्थायी समिती निवडणुकीपूर्वी शिवसेनेला मोठा फटका

106

जळगाव, दि.१० (पीसीबी) : महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. जळगावात गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपमधील 30 नगरसेवकांनी बंड पुकारत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधले होते. काही काळ उलटत नाही तोच जळगाव महापालिकेतील भाजपच्या तीन बंडखोर नगरसेवकांनी पुन्हा घरवापसी केली. भाजपचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. आगामी काळात होणार्‍या स्थायी समितीच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेला पाठींबा देणारे भाजपचे 3 बंडखोर नगरसेवक स्वगृही परतल्याने हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महापालिकेत भाजपचे 57 नगरसेवक निवडून आल्याने गेल्या अडीच वर्षापूर्वी मनपात भाजपाची सत्ता होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी पहिल्या टप्प्यात भाजपातील 27 नगरसेवकांनी बंडखोरी करीत मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत हातावर शिवबंधन बांधले होते. त्यामुळे मनपात सत्ता परिवर्तन होवून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला होता. त्यानंतर महापौर, उपमहापौर निवडणुकीनंतर पुन्हा तीन नगरसेवकांनी बंडखोरी करीत मुंबईला वर्षाबंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता.

आगामी काळात महापालिकेत स्थायी समिती सभापतीची निवड होणार आहे. या निवडीत भाजपचा गटनेता कोण याची चुरस वाढली आहे. यात भाजपकडून भगत बालाणी तर बंडखोरांकडून अ‌ॅड. पोकळे हे उमेदवार असतील. या पूर्वीच भाजपचे गटनेते कोण हे सिद्ध करावे लागणार असल्याने भाजपच्या पदाधिकार्‍यांनी बंडखोर नगरसेवक सुरेश सोनवणे, शोभा बारी व हसीना बी शेख या तिघांची घरपावसी केली आहे. त्यामुळे भाजपचे गटनेते भगत बालाणीच राहणार असल्याचे सिद्ध झाले आहे. आगामी काळात होणार्‍या स्थायी समितीच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेला पाठींबा देणारे भाजपचे 3 बंडखोर नगरसेवक स्वगृही परतल्याने हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

जळगाव महानगरपालिकेतील मार्च महिन्यात झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला. या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली.

WhatsAppShare