शिवसेनेला डावलून लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी भाजपची वायएसआर काँग्रेसला ऑफर

96

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी भाजपाने वायएसआर काँग्रेस या पक्षाला ऑफर दिल्याचे  समजते.  एनडीएतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने या पदासाठी दावा केला होता. मात्र, शिवसेनेला डावलून वायएसआर काँग्रेसला ही ऑफर देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

भाजपा खासदार आणि प्रवक्ते नरसिम्हा राव यांनी मंगळवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांची विजयवाडा येथे भेट घेतली आणि हा प्रस्ताव ठेवला आहे.

आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर वायएसआर काँग्रेसने जिंकल्या आहेत. भाजपाच्या या ऑफरला अद्याप जगनमोहन यांच्या पक्षाने कुठलेही उत्तर दिलेले नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, जगनमोहन यांनी राजकीय समीकरणांवर विचारविनिमय करण्याचे कारण देत थोडा वेळ मागितला आहे.

आंध्र प्रदेशातील मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाच्या मतदारांनी वायएसआर काँग्रेसला मोठा पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपच्या या ऑफरला स्वीकारण्यापूर्वी जगनमोहन  पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करणार आहेत. त्यानंतर ते भाजपचा प्रस्ताव स्वीकारायचा की नाकारायचा यावर निर्णय घेणार  असल्याचे सांगितले जात आहे.