शिवसेनेने भाजपशी असलेली ३० वर्षांची मैत्री तोडू नये- रामदास आठवले

82

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – देशात पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार येणार, असे भाकित करतानाच, भविष्यात शिवसेनेने भाजपशी असलेली ३० वर्षांची मैत्री तोडू नये असे, आवाहन आठवले यांनी रविवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिवसेनेला केले आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांनी आणलेला अविश्वासदर्शक ठराव संख्याबळाच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी हाणून पाडला. विरोधकांच्या प्रस्तावावर शिवसेनेने मतदानात भाग घेऊन, मोदी सरकारला साथ देण्याची गरज होती. पण शिवसेनेने बहिष्कार टाकून अविश्वसनीय पाऊल उचलले आहे. आगामी २०१९च्या लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा दावा रिपब्लिकन पक्षाचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

संसदेत रालोआ सरकारला स्पष्ट बहुमत असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवसेनेने केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करायला हवे होते. शिवसेनेची वाटचाल पाहता त्यांनी भाजपशी मैत्री तोडू नये. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छेप्रमाणे गेली अनेक वर्षे शिवसेना भाजप युती आहे ती कायम राहावी यासाठी भाजपसोबत असलेली ३० वर्षांची दोस्ती शिवसेनेने तोडू नये, असे आपल्याला वाटत असल्याचेही ते म्हणाले.