शिवसेनेने करून दाखवले; आयर्लंडमधील महामार्ग कोकणातला दाखवला, शिवसेना ट्रोल!

189

रत्नागिरी, दि. १० (पीसीबी) – शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील विद्यमान खासदार आणि भाजपा-शिवसेना-रिपाइं-रासप महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांची एक जाहिरात चांगलीच ट्रोल होत आहे. कोकणचा विकास कसा झाला हे दाखवताना राऊत यांनी जाहिरातीवर चक्क आयर्लंडमधील रस्त्यांचे फोटो छापले आहेत. त्यांच्या जाहिरातीत दाखवण्यात आलेला चार पदरी रस्ता कोकणात कुठेही नाही, हे माहित असल्याने नेटिझन्सनी त्यांनी दाखवलेला फोटो कुठला याचा शोध घेतला तर तो चक्क आयर्लंडमधला निघाला.

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून म्हणजेच १० मार्चपासून देशभरामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात सरकार नवीन योजना आणू शकत नसले तरी आश्वासनं द्यायला आडकाठी नसते. परिणामी अनेकजण मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जाहिरातबाजी करताना दिसत आहेत. विद्यामान खासदार त्यांनी केल्या विकासकामांचा पाढा जाहिरातींमधून वाचत आहेत तर पहिल्यांदाच संधी देण्यात आलेले उमेदवार आश्वासने देताना दिसत आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामधून शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप महायुतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत निवडणूक लढवत आहेत. राऊत यांच्या प्रचारासाठी प्रगत कोकण, शांत कोकण या टॅगलाइनसहीत पोस्टर्स छापण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये विनायक राऊत यांच्याबरोबरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच शिवसेना, भाजपा, रिपाइं आणि रासपच्या नेत्यांचे फोटो आहेत. मात्र या पोस्टर्सवर कोकणचा विकास म्हणून जो रस्ता दाखवण्यात आला आहे तो कोकणातील रस्त्यांचा नसून आयर्लंडमधील असल्याचं उघड झालं आहे.