शिवसेनेच्या १२ पैकी एका मंत्र्यांनेही काम केले नाही – बाळू धानोरकरांचा  शिवसेनेला घरचा आहेर

458

नागपूर, दि. २४ (पीसीबी) – शिवसेनेच्या १२ पैकी एका मंत्र्यांनेही काम केले नाही, असे म्हणत वरोरा-भद्रावती मतदारसंघाचे आमदार बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला. बाळू धानोरकर गुरुवारी (दि. २३) नागपूरमधील आयोजित पूर्व विभागीय मेळाव्यात बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “पूर्व विदर्भाच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या मंत्र्यांकडून वाईट वागणूक दिली जाते. एकाही कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही, मंत्री कुठलेच काम करत नाही, एक मेळावाही घेत नाहीत. या मंत्र्यांच्या काळात शिवसेना खाली गेली. भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत एकही मंत्री प्रचाराला आला नाही, वेळ देतात पण प्रचाराला येत नाही, ही शिवसैनिकांची फसवणूक आहे,” असा आरोपही धानोरकर यांनी केला आहे.

शिवसेनेच्या मंत्र्यांवर टीका करताना बाळू धानोरकर म्हणाले की, “मंत्र्याचे त्यांचे जिल्हात सोडाच पण त्यांच्या मतदारक्षेत्रातही काम नाही. शिवसेनेच्या १२ पैकी एका मंत्र्याचे जरी काम असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. शिवसेनेच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काही फायदा आहे का याचा विचार करा”, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.