शिवसेनेच्या विद्यमान आमदारांवर शेजारच्या दोन मतदारसंघांतही आमदार निवडून आणण्याची जबाबदारी

1723

मुंबई, दि. १ (पीसीबी) – शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष बनण्यासाठी राजकीय हालचालींना वेग दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विद्यमान आमदारांवर मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. शिवसेनेच्या प्रत्येक आमदारांवर आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघाच्या शेजारच्या दोन विधानसभा मतदारसंघांमधून आमदार निवडून आणण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

शिवसेनेने आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत व्यूहरचना काय असावी याचा राजकीय अभ्यास करून त्याप्रमाणे नियोजन करण्यात येत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. शिवसेना भवनात या बैठकांचे सत्र सुरू आहे. पक्षाचे नेते, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी विभागवार संवाद साधून त्यांचे मत या बैठकांमधून जाणून घेतले जात आहेत. पहिल्या टप्प्यात स्थानिक स्तरावर पदाधिकाऱ्यांचे फेरबदल आणि नियुक्त्या पार पाडल्या जात आहेत.

लोकसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया पुढील महिनाभरात पार पाडली जाणार आहे. लोकसभेबरोबर राज्यात विधानसभा निवडणुकीची शक्यता लक्षात घेता त्या उमेदवारांनाही मतदार संघात स्वतःची व्यूहरचना आखण्यास पक्षनेतृत्व संमती देईल, अशी माहिती लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते आनंदराव अडसूळ यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

त्यानुसार शिवसेनेच्या विद्यमान आमदारांवर मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. शिवसेनेची पुन्हा उमेदवारी हवी असल्यास आमदारांना आता स्वतःच्या मतदारसंघांबरोबरच शेजारच्या मतदारसंघातही भगवा फडकवावे लागणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षाच्या विद्यमान आमदारांवर त्यांच्या शेजारच्या दोन विधानसभा मतदारसंघांतही शिवसेनेचा आमदार निवडून आणण्याची जबाबदारी सोपवणार आहेत. त्यामुळे आता शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना पहिल्यापेक्षा जास्त काम करावे लागणार आहे.