शिवसेनेचे 90 टक्के आमदार, खासदार सरकारवर नाराज

208

नागपूर, दि. २२ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हो दोन पक्ष शिवसेनाला कमकुवत करत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यामुळे राज्यातील चर्चांना उधाण आलं आहे.

यावर भाजप पक्षाच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. भाजप पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको, असा गौप्यस्फोटच केला आहे. नागपूरमध्ये त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच प्रताप सरनाईकच नाही, तर शिवसेनेचे 90 टक्के आमदार, खासदार सरकारवर नाराज असल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. सरकारमध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचीच कामं होत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आपला पक्ष मजबूत करतायत, शिवसेना कमजोर होत आहे.

दरम्यान, प्रताप सरनाईकांनी आपल्या पत्रामध्ये शिवसेनेने पुन्हा भाजपसोबत युती करावी, अशी मागणी केली होती. त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे पुढील निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युती होणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

WhatsAppShare