शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ यांचे निधन

99

शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख बाबासाहेब धुमाळ (वय ७१) यांचे आज (रविवार)  हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. आज सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने निगडीतील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दरम्यान त्यांची उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली.  

धुमाळ गेल्या १२ वर्षापासून शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत होते. त्यांनी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. तसेच ते पुणे जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्षपदावर कार्यरत होते. महाराष्ट्र रिक्षा सेनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. २०१२ ते १७ या दरम्यान ते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक होते. तसेच त्यांनी ११ वर्षे पिंपरी -चिंचवड शिवसेना शहर प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली होती.

त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुलगे, १ मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.