शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव  नवीन पक्ष काढणार

1148

 कोल्हापूर, दि. १९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीवरून समाजात बिघडत चाललेल्या परिस्थितीला रुळावर आणण्यासाठी एका नवीन राजकीय पक्षाची स्थापना करणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली.

हर्षवर्धन जाधव कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. येत्या २७ ऑगस्टला  मुंबईमध्ये  राजकीय पक्ष  काढण्यासंदर्भात राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर लगेचच राजकीय पक्षाची घोषणा करण्यात येईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी यापूर्वीही अनेकदा स्वतंत्र पक्ष काढण्याचे सुतोवाच  केले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा दिल्यापासून त्यांचा राज्यभरात विविध ठिकाणी दौरा सुरु आहे. अखेर आपण स्वतंत्र पक्ष काढणार असल्याचे  त्यांनी म्हटले आहे.

हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत.  तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण औरंगाबाद दौऱ्यावर असताना जाधव यांनी पोलिसांशी वाद घालून  पोलिसांना मारहाण  केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.