शिवसेनेचे आमदार फोडण्याची कोणाची हिंमत नाही- संजय राऊत

0
444

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – शिवसेनेचे आमदार फोडण्याची कोणाची हिंमत नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. शिवसेना आमदारांच्या फोडाफोडीच्या शंकेवरून त्यांना मुंबईतील हॉटेलमध्ये हलवण्याच्या वृत्तावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी अशाप्रकारच्या कोणत्याही वृत्ताचे खंडन केले.

शिवसेनेच्या वाऱ्याला उभे राहायची हिंमत कोणीही करून दाखवावी. शिवसेनेच्या आमदारांच्या आसपास फिरकायची कोणाची हिंमत नाही. आमचे आमदार निष्ठावान आहेत. आमचे आमदार फुटणार नाहीत याची खात्री आहे. त्यांना संपर्क करण्याची कोणाची हिंमत नाही, असे राऊत यावेळी म्हणाले. राज्यात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत आमदार फोडाफोडीच्या गोष्टी होत असतात. अनेक राज्यांमध्ये अशा गोष्टी झाल्या आहेत. पण महाराष्ट्रात आम्ही अशा गोष्टी होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फुटणार नाहीत. ज्या पक्षाकडे १४५ आकडा असेल त्यांनी आपले सरकार बनवावे. मी कोणत्याही प्रकारची शेरेबाजी नाही करत. मी केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका तुमच्या समोर मांडतो. मी केवळ पक्षाचे काम करत आहे, असेही ते यावेळी म्हणाले. आमच्या शुभेच्छा भाजपासोबत आहेत. त्यांनी आपले बहुमत सिद्ध करावे. लवकरच गोड बातमी देणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणतात. पण गोड बातमी काय आहे, हे पहावे लागेल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच आहे, अशी गोड बातमी एक दिवस सुधीर मुनगंटीवार देतील, असेही त्यांनी नमूद केले.