शिवसेना लोकसभा स्वबळावर लढवणार?; संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू  

220

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी शिवसेनेने चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्यासाठी उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. गणेशोत्सावाच्या आधी उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर शिवसेनेच्या  राज्यभरातील १९ विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  पक्षबांधणी आणि निवडणूक रणनीतीसाठी शिवसेना भवनात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार आणि नगरसेवकांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मुंबईतील भाजप खासदारांविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी शिवसेनेतील अनेक नावांवर  चर्चा करण्यात आली. मुंबईत एकूण ६ खासदार असून ३ खासदार शिवसेनेचे आहेत तर ३ खासदार भाजपचे आहेत. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, उत्तर पश्चिम मुंबईतून गजानान कीर्तीकर यांना पुन्हा संधी मिळू शकते. तर उत्तर पूर्व मुंबईत भाजप खासदार पूनम महाजन यांच्या विरोधात मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या नावाची चर्चा आहे.

उत्तर मुंबईत भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची नावे समोर आली आहेत. ईशान्य पूर्व मुंबईत भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात मनसेतून आलेले शिशिर शिंदे आणि निलम गोऱ्हे यांना उमदेवारी देण्याची शक्यता आहे.