शिवसेना, राष्ट्रवादीचा विरोध डावलून सांगवी-किवळे रस्त्याचे डांबरीकरण, 21 कोटींचा खर्च

101

पिंपरी, दि. 13 (पीसीबी) – सांगवी ते किवळे रस्ता सुस्थितीत असतानाही इलेक्शन फंडासाठी भाजपकडून काम हाती घेतल्याचा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप करुनही सत्ताधारी भाजपने काम हाती घेतले. डांबरीकरण, चेंबर समपातळीस करणे आणि अनुषांगिक कामे करण्यासाठी येणा-या 21 कोटी 40 लाख 12 हजार रुपये खर्चाला स्थायी समितीच्या सभेत आयत्यावेळी मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या स्थापत्य विभागाने सांगवी ते किवळे रस्त्याचे डांबरीकरण, चेंबर समपातळीस करणे आणि अनुषांगिक कामे करण्यासाठी निविदा मागविली होती. निविदेची रक्कम 30 कोटी 94 लाख 95 हजार रुपये इतकी होती. या निविदाप्रक्रियेत तीन ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी आर.एम.के. इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराची निविदा रकमेच्या 31.76 टक्के कमी दराची निविदा आहे.

तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची असल्याने आयुक्त राजेश पाटील यांनी 1 जानेवारी 2022 रोजी ही निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. या ठेकेदाराकडून निविदा मंजूर दराने रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग चार्चेसह 21 कोटी 40 लाख 12 हजार रुपयात काम करुन घेतले जाणार आहे. 6 महिन्यात काम पूर्ण केले जाणार आहे. या ठेकेदारासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.