शिवसेना-भाजपच्या उमेदवाऱ्या जाहीर होऊ द्या, मग तेथील गर्दी कशी ओसरते ते बघा – सतेज पाटील

134

कोल्हापूर,  दि. १३ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या उमेदवाऱ्या जाहीर होऊ देत; मग तेथील गर्दी कशी ओसरते ते बघा,’ असा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी लगावला. अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात असून थोड्या दिवसांत नवीन अध्याय सुरू होईल, असेही ते म्हणाले.

आमदार पाटील म्हणाले, ‘एनएसयूआय’पासून मी काँग्रेसमध्ये काम करीत आहे. अडचणीच्या काळात जबाबदारी दिली आहे. विधानसभा तोंडावरच असल्याने फारशी डागडुजी करता आलेली नाही; पण विधानसभेनंतर सभासद नोंदणीच्या माध्यमातून काम करणार आहे.

सोशल मीडियात आम्ही कमी पडतो, हे खरे आहे; म्हणूनच जिल्हा काँग्रेसचा स्वतंत्र मोबाईल क्रमांक सुरू केला असून, त्या माध्यमातून कॉँग्रेसचे नवीन कार्यक्रम आणि सरकारची चुकीची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. वीज दरवाढीने उद्योजक हैराण असून  भाजप सरकारने त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.