शिवसेना आमदाराची ‘त्या’ पूरग्रस्त महिलेला दमदाटी; विरोधकांनी धरलं धारेवर; तर सोशलमिडिया वरती….

149

चिपळूण, दि.२६ (पीसीबी) : महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूण शहराचा दौरा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. यावेळी त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांना धीर देताना पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची सर्वकष योजना जाहीर केली जाईल असंही सांगितलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामधील एका घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि खास करुन शिवसेनेला चांगलच धारेवर धरलं आहे. शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच केलेल्या दमदाटीमुळे चांगलाच संताप सोशल नेटवर्किंगवरुन व्यक्त केला जात आहे. मात्र नक्की काय घडलं हे अनेकांना ठाऊक नाहीय. त्यामुळेच काल चिपळूणच्या बाजारपेठेत नक्की काय घडलं हे जाणून घेऊयात….

काल चिपळूणच्या पहाणी दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांचं झालेलं नुकसान आणि त्यांचं दुःख ऐकत होते. त्यावेळी स्वाती भोजने या त्यांच्या दुकानासमोर उभ्या होत्या. मुख्यमंत्री पहाणी करताना स्वाती यांच्या दुकानासमोर आले तेव्हा स्वाती यांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. “माझं घर गेलं… माझं दुकान गेलं… तुम्ही काहीतरी करा…”, असं म्हणत स्वाती यांनी आपली तक्रार मांडण्यास सुरुवात केली. “तुम्ही काय पण करा… तुम्ही आमदार-खासदारांचा दोन महिन्यांचा पगार कोकणासाठी फिरवा… तुम्ही काय पण करा पण मदत करा..”. असं अगदी रडत रडत स्वाती यांनी सांगितलं. यावर मुख्यमंत्र्यांनी मान हलवत होकार देत, “वळवतो… वळतवो..” असं म्हटलं. मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत असलेले स्थानिक आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अगदी दमदाटीच्या स्वरामध्ये स्वाती यांच्या मुलाला आईला समजवण्यास सांगितलं. आमदार, खासदारांचा दोन महिन्याचा पगार देण्याच्या मागणीवर भाष्य करताना जाधव यांनी, “हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील पण त्याने काय होणार नाही,” असं स्वाती यांना सांगितलं. त्यावर फूल ना फुलाची पाकळी समजून आम्हाला मदत करा अशी मागणी स्वाती यांनी केली. मात्र भास्कर जाधव यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चला म्हणत मुख्यमंत्र्यांसोबतच्या ताफ्यातील लोकांना पुढे जाण्याचा इशारा केला. मात्र त्यानंतर मागे वळून पाहत, “बाकी काय?, तुमचा मुलगा कुठंय” असं भास्कर जाधव यांनी हातवारे करुन विचारलं. त्यानंतर स्वाती यांचा मुलगा दिसताच, “आईला समजव… आईला समजव… उद्या भेट” असं भास्कर जाधव म्हणाले. या भेटीचं आमंत्रणही त्यांनी दमदाटीच्या स्वरातच दिल्याचं पहायला मिळालं.

मात्र त्यानंतर ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीशी बोलताना स्वाती यांनी, “आम्हाला किमान दुकानाच्या वर बसायला मजला तरी आहे. आम्ही तिथे बसलो होतो. घरातल्या सगळ्या वस्तू पाण्याखाली आहेत. एकही वस्तू राहिलेली नाही. आम्ही चार दिवस नुसतं दुकान साफ करतोय तरी ते होत नाहीय. अजून दोन भाग धुवून झालेत चार राहिलेत. माझी एकटीची व्यथा नसून सर्व व्यापाऱ्यांची व्यथा आहे. कोणाचं काहीही वाचलेलं नाहीय,” असं स्वाती म्हणाल्या. त्यांनी एवढी आश्वासने दिली आहेत तर मदत द्यायला पाहिजे. एकाचं असेल तर दाबलंही जाईल पण सर्वांचेच हेच हाल आहेत, त्यामुळे तातडीने मदत करावी असंही स्वाती म्हणाल्या.

WhatsAppShare