शिवसेनारूपी सावित्रीमुळे सरकार टिकून; विरोधकांची टीका

36

नागपूर, दि. ३ (पीसीबी) – राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवारपासून (दि. ४) सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्‍या चहापानावर विरोधकांनी बहिष्‍कार टाकला आहे. शिवसेनारूपी सावित्री सरकारच्‍या पाठीशी ठामपणे उभी असल्‍यानेच हे सरकार टिकून आहे, अशी टीका यावेळी विरोधकांनी केली.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) नागपूरात विरोधी पक्षांच्या नेत्‍यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण आदी नेते उपस्थित होते.

या अधिवेशनात कर्जमाफीतील गोंधळ, खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज देण्‍यास होत असलेला विलंब, पीक विमा, अफवेमुळे राज्‍यभरात जमावाकडून होत असलेल्‍या हत्‍या, पावसामुळे मुंबईत होणाऱ्या दुर्घटना व मुंबईकरांचे हाल, कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्‍या न थांबलेल्‍या आत्‍महत्‍या, या मुद्द्यांवरून विरोधक राज्‍य सरकारला घेरण्‍याचा प्रयत्‍न करण्याची शक्यता आहे.

शेतकरी, सामान्‍य माणूस, दलित, आदिवासी कोणालाही हे सरकार आपले वाटत नाही. त्‍यांच्‍या धोरणांचा सर्वांना फटका बसला आहे. या मुद्द्यांवर अधिवेशनात आम्‍ही सरकारला जाब विचारू’, असे विखे- पाटील म्हणाले. तर सामान्‍यांच्‍या विविध समस्‍यांना वाचा फोडण्‍याचा आमचा प्रयत्‍न असेल, असे धनंजय मुंडे यांनी म्‍हणाले.