शिवरायांच्या आजोबांचे दुर्मिळ चित्र न्यूयॉर्कमध्ये

101

पुणे, दि. १७ (पीसीबी) – सिंदखेड प्रांताचे राजे, राजमाता जिजाऊ साहेबांचे वडील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा लखुजीराजे जाधव यांचे चारशे वर्षांपूर्वीचे चित्र अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे सापडले आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी काढलेले हे चित्र मराठ्यांच्या इतिहासातील सुरूवातीच्या एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या पाऊलखुणा अधोरेखित करणार आहे. या चित्राबरोबरच व्यक्तीचित्रांसाठी प्रसिद्ध असणारा चित्रकार हाशिम याचीही माहिती इतिहा अभ्यासकांना मिळू शकेल. न्यूयॉर्क येथील ‘मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट’ या राष्ट्रीय संग्रहालयात हे चित्र इतिहास अभ्यासक मनोज दाणी यांना सापडले आहे. या संग्रहालयामध्ये ‘बादशाही अल्बम’ नावाचा एक चित्रांचा संग्रह असून, त्यामध्ये लखुजीराजे जाधवांचे चित्र जतन करण्यात आले आहे. हा संग्रह जहांगीर बादशाहच्या काळात बनवण्यास सुरुवात झाली. शाहजादा खुर्रम म्हणजे शहाजहान याच्या काळात त्यात आणखी काही चित्रे जोडली गेली. औरंगजेबाच्या राज्यकाळात हा संग्रह पूर्ण झाला.

या संग्रहावर असलेल्या शिक्क्यांवरून आणि सुरुवातीच्या ‘शमसा’ आणि ‘उनवान’ या नक्षीदार पानांवरून दाणी यांनी संग्रहाबद्दल माहिती संकलित केली आहे. ही चित्रे अनेक वर्षे दिल्लीत बादशाही संग्रहात होती. १७३९ मध्ये नादिरशहाच्या लुटीतून ती वाचली. १८०२ साली इंग्रजांनी मराठ्यांकडून दिल्ली घेतल्यावर जेम्स फ्रेझर आणि त्यांच्या बंधूनी स्थानिक मोगल चित्रकारांकडून जुन्या चित्रांच्या नवीन प्रती बनवून घेतल्या. त्यानंतर हा चित्रांचा संग्रह दिल्लीतील आर्ट डीलर यांच्याकडे होता. कालांतराने पाश्चात्य संग्राहकानी तो विकत घेऊन परदेशी नेला.