शिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का

144

कुरुक्षेत्र, दि. २० (पीसीबी) –  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवणार आहे, अशी घोषणा शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी केली आहे. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. तर आणखी एक जवळचा मित्रपक्ष दुरावल्याने आगामी निवडणुकीत भाजपच्या अडचणी वाढणार आहेत.

पिपलीनगर येथील धान्य बाजारात  एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  बोलताना बादल म्हणाले की, आम्ही पंजाबच्या जनतेला दिलेले आश्वासन  पाळले आहे. आता  आम्ही हरियाणामध्ये विकास  करण्याची जबाबदारी घेत  आहोत. यावेळी त्यांनी पंजाबी समाजाला हरियाणामध्ये विकासासाठी सहकार्य करण्याची विनंतीही केली. यावेळी बादल यांनी  अनेक विकासकामांचे आश्वासन दिले.

दरम्यान, भाजप आणि अकाली दल गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र निवडणुका लढवत आहेत.   दोन्ही पक्षांनी आतापर्यंत एकत्रित निवडणुका लढवल्या आहेत. गेल्यावेळीही हरियाणा विधानसभेसाठी दोन्ही पक्षांनी युती केली होती. पण त्यांना पराभव  स्वीकारावा लागला होता.  आता बादल यांनी वेगळे लढण्याची घोषणा केल्याने भाजपला मोठा  धक्का बसला आहे.