शिरूर मतदारसंघात शिवसेनेचा रडीचा डाव; राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंचा कसदार राजकीय अभिनय

397

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – निवडून येण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित म्हटल्या जाणाऱ्या शिरूरमध्ये पराभवाची चिन्हे दिसू लागल्याने शिवसेनेने आता रडीचा डाव सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. पन्हाळगडावर प्रेमगीताचे चित्रीकरण केल्याचा मुद्दा उकरून काढून राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना घेरण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. परंतु, प्रेमगीताचे चित्रीकरण झाले, त्यावेळी अमोल कोल्हे हे शिवसेनेत होते. मग त्यावेळी शिवसेनेने कोल्हे यांना पक्षातून काढून टाकून शिवाजी महाराजांवरचे प्रेम आणि निस्सीम भक्ती का दाखविली नाही?, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि राजकारण करायचे हाच शिवसेनेचा धंदा असेल तर आता मतदारांनीच ठरवण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे शिवसेनेच्याच मुशीत तयार झालेले अमोल कोल्हे हे सुद्धा राजकीय अभिनयात पटाईत असल्याचे प्रचार सभांमधून पहायला मिळत आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा हमखास विजय असे राजकीय समीकरण बनले होते. त्यामुळे या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील थेट शरद पवार यांनाच आपल्यासमोर उभे राहण्याचे आव्हान देताना जनतेने पाहिले आहे. परंतु, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांच्या तोंडचे पाणी पळाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे. २०१९ ची निवडणूक आढळराव पाटील यांची दमछाक करणारी ठरली आहे. प्रत्येक निवडणुकीत आढळराव पाटलांच्या आश्वासनांवर जगणाऱ्या शिरूरमधील मतदारांनी यंदा वेगळाच विचार केल्याचे मतदारसंघात जाणवत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आढळराव पाटलांची सीट यंदा धोक्यात असल्याचे राजकीय निरीक्षकांचे स्पष्ट मत आहे.

शिवसेनेला आणि स्वतः आढळराव पाटील यांनाही निवडणुकीतील विजय मागच्या तीन निवडणुकांप्रमाणे सोपा नसल्याची कुठेतरी जाणीव झालेली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा जोर लावला, दुरावलेली माणसे जवळ केली, विरोधकांची माणसे फोडली आणि महत्त्वाचे म्हणजे खर्चापाण्याची मजबूत व्यवस्था झाली तरच शिरूरमध्ये शिवसेनेचा विजय दृष्टीक्षेपात येईल, अशी स्थिती आहे. परंतु, हे सर्व राजकीय डावपेच खेळण्याऐवजी शिवसेनेने रडीचा डाव मांडल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे हे कसे नालायक उमेदवार आहेत हे दाखवून देण्यासाठी कोल्हे यांनी पन्हाळगडावर चित्रीकरण केलेल्या प्रेमगीताचा मुद्दा शिवसेनेने उकरून काढला आहे. त्यासाठी पक्षातील महिला ब्रिगेडला पुढे केले गेले आहे.

महाराष्ट्रातील गडकिल्ले म्हणजे जनतेसाठी भावनिक मुद्दा आहे. कारण गडकिल्ले हे शिवाजी महाराजांचे श्वास आणि आत्मा होते. या किल्ल्यांवरूनच शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचे परकीयांपासून रक्षण केले. गडकिल्ल्यांवर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, तर जनता ती सहन करत नाही. त्यामुळेच पन्हाळगडावरील प्रेमगीताच्या चित्रीकरणाचा मुद्दा उकरून काढून अमोल कोल्हे यांच्या विरोधात जनतेच्या भावना भडकावण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसून येत आहे. परंतु, हा प्रयत्न होत असताना आपणही उघडे पडतोय याचे शिवसेनेला भान राहिले नसल्याचे पाहायला मिळत आहे. पन्हाळगडावर चित्रपटातील प्रेमगीताचे चित्रकरण झाले, त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे हे शिवसेनेत होते.

त्यावेळी कोल्हे हे शिवसेनेचे संपर्कप्रमुख होते. एवढेच नाही तर स्टार प्रचारक देखील होते. पन्हाळगडावर चित्रीकरण झालेले शिवसेनेला त्यावेळी चालले. अमोल कोल्हे यांना डोक्यावर घेऊन शिवसेना त्यावेळी नाचली. त्यावेळी शिवसेनेला शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकिल्ले आठवले नाहीत. आता मात्र शिवसेनेला निवडणुकीत पराभव दिसून लागल्यानंतर शिवाजी महाराज आणि गडकिल्ले दिसू लागले काय?, असा प्रश्न शिरूर मतदारसंघातील मतदारांना पडला आहे. शिवसेनेचे शिवाजी महाराजांवरील हे बेगडी प्रेम खरोखरच लाज आणणारी असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. शिवाजी महाराजांच्या नावावर राजकीय धंदा करणाऱ्या शिवसेनेचे महाराजांवर एवढेच प्रेम असेल, तर त्यांचे गडकिल्ले शाबूत राहावेत यासाठी पाच वर्षांच्या सत्तेचा काय उपयोग केला?, असा सवाल मतदार करू लागले आहेत.

दुसरीकडे संभाजी महाराजांची भूमिका करता करता राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे हे देखील निवडणुकीत “संभाजी” लाटेवर स्वार होण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. कोल्हे यांनी आपल्या प्रचारासाठी संभाजी मालिकेतील भूमिकेचा पुरेपूर वापर करून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेत अभिनय करता करता ते कसलेल्या राजकारण्यांसारखे कसदार राजकीय अभिनय करू लागले आहेत. राजकीय अभिनयात पटाईत झालेल्या अमोल कोल्हेंना शिरूर मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता प्रचारासाठी सात-आठ दिवस उरले आहेत. शिवसेनेचा रडीचा डाव आणि राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंचा कसदार राजकीय अभिनय प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कोणकोणते रंग घेतात आणि शेवटी विजय कोणाचा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.