आगामी लोकसभेसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातून   विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलिप वळसे- पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली जाणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, या मतदार संघातून राष्ट्रवादीचा कोण उमेदवार असेल, यावर बोलणे पवार यांनी टाळले. त्यामुळे कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली आहे.    

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनासाठी अजित पवार शिरूरमध्ये आले होते. यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की,  लोकसभेसाठी वळसे-पाटील यांना उमेदवारी दिली जाणार नाही. कोणाला खासदार करायचे आणि कोणाला आमदार करायचे याबाबत आम्ही ठरविणार आहोत. तर, विधानसभेसाठी बारामतीतून मी आणि आंबेगावमधून वळसे -पाटील निवडणूक लढवणार आहेत. मात्र, पक्षाने तिकिट दिले तर! अशीही मिश्कील टिप्पणी पवार यांनी केली.

दरम्यान, वळसे- पाटील यांचे नांव मागे पडल्याने राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार?   याबाबत राष्ट्रवादीत उत्सुकता लागून राहिली असताना शिरूरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव  आढळराव-पाटील यांनाही आपल्या विरोधात कोण उमेदवार असणार याची उत्सुकता लागली असेल.