‘शिक्षणातील खरा हिरो कायमच शिक्षक असेल’: पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू मा. श्री. उमराणी सरांचे गौरवोद्गार

55

– शिक्षक हे समाजाच्या उभारणीची पाऊलवाट : आ. चंद्रकांतदादा पाटील

– आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून भाजपा कोथरूड मंडलच्यावतीने शिक्षकांचा गौरव

पुणे, दि.१३ (पीसीबी) : आजच्या आधुनिक युगात कॉम्प्युटर हा हिरो नसून शिक्षकच हिरो आहेत. कारण अध्ययन, अध्यापन, आकलन, संशोधन, मुल्यमापन ही सूत्रं कधीही कॉम्प्युटरकडे हस्तांतरित होणार नाहीत. त्यामुळे शिक्षणातील खरा हिरो शिक्षकच असणार आहे, असे गौरवोद्गार पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू मा. श्री. उमराणी सर यांनी काढले.आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि भाजपा कोथरूड मंडलाच्या वतीने नवरात्रीतील सरस्वती पूजनाचे औचित्य साधून शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना श्री. उमराणी सर बोलत होते. सर पुढे म्हणाले की, कोविडच्या १८ महिन्याच्या कालावधीतही सर्वाधिक अध्ययन हे शिक्षकांचे झाले आहे. कोविडमधील आव्हान सर्व शिक्षकांनी यशस्वीपणे पेलले म्हणून आज शिक्षकांचा गौरव होत आहे.

ते पुढे म्हणाले की, आजच्या आधुनिक काळात लिबरल एज्युकेशनची लाट आहे. याचा अर्थ आंतरविद्या शाखीय ज्ञान, किंवा बहुविद्या शाखीय ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे, अशी भूमिका नवीन शैक्षणिक धोरणातून मांडली गेली आहे. याचे मुख्य कारण मुलांमधील सृजनशीलता जोपासणे, त्यांना उदयोन्मुख बनवणे आणि सामाजिक विकास साधने हा आहे. समाजाचे वैविध्य टिकवून ठेवण्यासाठी दहावी नंतर मुलांमध्ये संशोधनाची आवड जोपासण्यासाठी बहुविधविषयाचे ज्ञान असणे गरजेचे ‌आहे.

या कार्यक्रमाला पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रसेनजीत फडणवीस, स. प. महाविद्यालयाच्या निवृत्त प्रा. राजश्री कशाळकर, पुणे शहर भाजपा सरचिटणीस गणेश घोष, शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, शहर चिटणीस प्रशांत हरसुले, चिटणीस अनिता तलाठी, पुणे शहर उद्योग आघाडी अध्यक्षा अमृता देवगांवकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, उपाध्यक्ष राज तांबोळी, सरचिटणीस प्रा.अनुराधा येडके, सचिन पाषाणकर, गिरीश भेलके, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष महेश पवळे, बाळासाहेब टेमकर, शिवाजी शेळके, अमोल डांगे, नवनाथ जाधव, केतकी कुलकर्णी आदींसह पक्षाचे कार्यकर्ते आणि सन्मानित शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमात आ. चंद्रकांतदादा पाटील हे व्हर्च्युअली सहभागी झाले होते. उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, शिक्षक हे समाजाच्या उभारणीची पाऊलवाट असतात. आणि ही समाज विकास पाऊलवाट भक्कम करण्यात शिक्षकांचे महत्वाचे योगदान आहे.

या कार्यक्रमात बोलताना प्राध्यापिका राजश्री कशाळकर म्हणाल्या की आजच्या काळात सर्वच शिक्षक हे प्रतिभावान आहेत. ते विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना घडवत असतात. परंतु एखाद्याच डिसले गुरुजींच्या कामाची दखल घेतली जाते. प्रत्येकच शिक्षकांमध्ये कमी अधिक प्रमाणात सृजनशीलता असते आणि त्याची दखल सर्वच स्तरातून घेतली म्हणजे शिक्षकांच्या मनावरील मरगळ कमी होण्यास मदत होईल.

या कार्यक्रमात सिनेट सदस्य प्रसेनजीत फडणवीस आणि पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका अनुराधा येडके यांनी केले. तर आभार प्रदर्शन कोथरूड मंडल उपाध्यक्ष राज तांबोळी यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका ज्योती पोकळे यांनी केले.

WhatsAppShare