शिक्रापूर-चाकण रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण ठार

71

चाकण, दि. २४ (पीसीबी) – शिक्रापूर-चाकण रोडवर अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या एका व्यक्तीला जोरात धडक दिली. त्यामुळे जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 23) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास घडला.

शिवाजी शंकर सूर्यवंशी (वय 50) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी तुकाराम सीताराम कांबळे (वय 67, रा. शिक्रापूर, चाकण रोड, ता. खेड. मूळ रा. हिंगोली) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे जावई मयत शिवाजी सूर्यवंशी गुरुवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोड येथे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका वाहनाने शिवाजी यांना जोरात धडक दिली. त्यात शिवाजी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता तसेच पोलिसांना घटनेची माहिती न देता आरोपी वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला. यामध्ये शिवाजी यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare