शालेय विद्यार्थ्यांच्या वह्यांवर भाजपची जाहिरात; रावसाहेब दानवेंचे प्रचारतंत्र

50

जालना, दि. ३० (पीसीबी) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या वह्यांवर आपल्या जाहिराती छापल्या आहेत. या प्रकारावर विरोधकांकडून दानवे यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

जालना शहर भाजपच्या कार्यालयात शालेय, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वह्यांची विक्री सुरू केली आहे. या वह्या विद्यार्थ्यांना निम्म्या किंमतीत दिल्या जाणार आहेत. या वह्यांची किंमत १८ रूपये प्रती नग याप्रमाणे २१६ रूपये डझन अशी दिली जाणार आहे.

मात्र, दानवेंनी या वह्यांचा वापर एकप्रकारे राजकीय प्रचारासाठी केला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आपल्या कामाचा लेखाजोखा समजावा, या हेतूने गेल्या चार वर्षातील कामाची यादीच या वह्यांच्या पृष्ठभागावर छापण्यात आली आहे. तब्बल १ लाख वह्या अशा छापण्यात आल्या आहेत. याची चर्चा सर्वत्र होऊ लागली असून विरोधकांकडून दानवेंवर टीकेची झोड उठवली जात आहे.