शांतता भंग करण्याचा प्रयत्न : धुळ्यात दोघांना अटक

68

धुळे, दि. ९ (पीसीबी) – रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज (९ नोव्हेंबर) लागणार आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पंतप्रधान मोदींसह पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे. पण धुळ्यात दोन समाजकंठकाकडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी धुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना बेड्या ठोकल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

धुळ्यातील जुन्या आग्रा रोड परिसरातील काही दुकानांच्या भिंतीवर राजेंद्र मराठे याने ऑइल पेंटने जय श्रीराम असे लिहित शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून धुळे शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी राजेंद्र मराठेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच धुळ्यातीलच गोरक्षक संजय शर्मा याने स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे त्याच्याविरोधात आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये २० नोव्हेंबरपर्यंत कलम 144(1)(3) लागू करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवा पसरवू नये, समाज माध्यमातून कुठल्याही जाती, धर्माविषयी आक्षेपार्ह टिपण्णी, व्हिडीओ, संदेश पोस्ट करू नये असे आवाहन केले आहे.