शहा आणि ठाकरे यांच्या भेटीवर राज यांचे कुंचल्याचे फटकारे

27

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्याचे फटकारे मारले असून एकमेकांची गळाभेट घेत असताना प्रत्यक्षात मात्र हे दोघे एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत, असे व्यंग राज यांनी रेखाटलं आहे.

शिवसेना-भाजपमधील तणाव कमी करण्यासाठी अमित शहा यांनी बुधवारी मुंबई भेटीदरम्यान मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये दोन तासांपेक्षा अधिक वेळ चर्चा झाली. ही भेट सकारात्मक झाल्याचे नंतर भाजपमधील सूत्रांकडून सांगण्यात आले मात्र, शिवसेनेकडून त्यास दुजोरा देण्यात आला नाही. अमित शहा यांच्या भेटीनंतर गुरुवारी उद्धव यांची पालघरमध्ये सभा झाली. तिथे त्यांनी या भेटीवर भाष्य केले नाही मात्र, त्यांच्या भाषणात टीकेचे लक्ष्य भाजपच होता. शिवाय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही शिवसेनेच्या कार्यकारिणीत स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय झालेला आहे. शहा यांच्या भेटीने हा निर्णय आता बदलणार नाही, असे सांगून आता युती अशक्य असल्याचेच संकेत दिले. शिवसेना-भाजपमधील कुरघोडीच्या राजकारणाच्या या ताज्या अंकावर राज यांनी अत्यंत मार्मिक असे व्यंगचित्र रेखाटले आहे.

उद्धव आणि अमित शहा गळाभेट हा केवळ दिखावा आहे. प्रत्यक्षात या दोघांच्याही हातात खंजीर आहे आणि दोघेही एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसायच्या तयारीत आहेत, अशाप्रकारचे हे व्यंगचित्र आहे. राज यांनी उद्धव यांच्या खिशातील राजीनामेही या व्यंगचित्रात दाखवलेत. ‘भेट आणि मन की बात’ असे शिर्षक या व्यंगचित्राला देण्यात आले आहे.